“अनोख्या सर्जनशीलतेमुळेच ‘ऊंचाई’ने मला नवीन उंचीवर नेले”-सूरज बडजात्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सूरज बडजात्या यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, निर्माता-दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अत्यंत अभिमानाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ऊंचाई चित्रपटाबाबतचे पुरस्कार स्वीकारले तेव्हा सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. हा पुरस्कार म्हणजे सूरज बडजात्या आणि नीना गुप्ता यांच्या गौरवशाली कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. सूरज बडजात्या आणि राजश्री प्रोडक्शन कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखले जातात.

सूरज बडजात्या यांना ऊंचाई चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित असा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या सहकार्याने राजश्री प्रॉडक्शनने निर्मित केलेला हा चित्रपट मैत्रीच्या नात्यावर आधारित होता आणि अनोख्या मैत्रीच्या कथेसोबतच तो त्याच्या चित्रिकरणासाठीही चांलाच चर्चेत होता आणि प्रेक्षकांनाही चित्रपटाला उचलून धरले होते. ऊंचाई ने सूरज बडजात्या यांच्या पुरस्कारासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

नीना गुप्ता यांना ऊंचाई चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऊंचाई सोबतच्या प्रवासाबाबत बोलताना सूरज बडजात्या यांनी सांगितले, “खरे पाहिले तर माझ्या अगोदरच्या चित्रपटांच्या तुलनेत ऊंचाई हा तसा भव्य आणि कौटुंबिक कथा असलेला चित्रपट नव्हता, माझ्याकडून असा चित्रपट तयार केला जाईल अशी अपेक्षाही कोणी केली नव्हती, पण ऊंचाई चित्रपटाची कथा माझ्या मनात आली आणि हा चित्रपट मी अगदी मनापासून तयार केला. मला मैत्रीची वेगळी गाथा यातून दाखवायची होती. मी एवढेच म्हणेन की मी ऊंचाई ची निवड केली नाही तर ऊंचाई नेच माझी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली. आज मिळालेला हा पुरस्कार ऊंचाई च्या संपूर्ण प्रवासाचा परिपूर्ण कळस आहे.”

एक धाडसी सिनेमॅटिक कल्पना

राजश्री प्रॉडक्शनचा ऊंचाई हा साठावा चित्रपट. ऊंचाई ची संकल्पना आणि चित्रीकरण कोरोना काळात करण्यात आले होते. खरे तर हा काळ म्हणजे चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांसाठी अनिश्चिततेचाच काळ होता. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेली मैत्रीची ही कथा आशादायक होती. समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर शूट केलेला हा पहिला हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचा क्रू आणि कलाकारांसाठी अशा ठिकाणी शूटिंग करणे म्हणजे एक आव्हानच होते. पण सगळ्यांनी ते आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले.या चित्रपटाने मला नवीन उंचीवर नेल्याचे सांगत सूरज बडजात्या पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीत शूटिंग करताना आगामी धोक्यांची सतत भीती वाटत असे, चित्रपटाचा भावनिक गाभा आणि जबरदस्त चित्रिकरण प्रेक्षकांशी जोडले गेले, या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, उत्तम कथा असेल तर ती परंपरागत चित्रपट निर्मितीच्या कक्षा ओलांडून खूप पुढे जाऊ शकते.”

 राष्ट्रीय ओळख आणि प्रतिबिंब

‘हम आपके है कौन’ ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ३० वर्षांनी, सूरज बडजात्या पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्काराच्या प्रतिष्ठेच्या मंचावर उभे राहिले, यावेळी त्यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. सूरज बडजात्या म्हणाले, “३० वर्षांपूर्वी जेव्हा मी पुरस्कार घ्यायला आलो तेव्हा, एक तरुण दिग्दर्शक उत्साहाने सळसळत होतो. आज मात्र कृतज्ञता आणि एका अनोख्या शांततेची भावना मनात आहे. ” सूरज बडजात्या यांनी त्यांचा हा पुरस्कार चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या आपल्या राजश्री प्रॉडक्शनला समर्पित केला. यासोबतच त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या श्री. महेश भट्ट, श्री. एन. चंद्रा आणि श्री. हिरेन नाग यांच्यासह अन्य मार्गदर्शकांना समर्पित केला.

नीना गुप्ता यांची विजयी गाथा

*ऊंचाई*साठी सूरज बडजात्या यांच्यासोबतच नीना गुप्ता यांनाही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. नीना गुप्ता यांच्या *ऊंचाई*मधील शबिना सिद्दीकीच्या व्यक्तिरेखेने चित्रपटात भावनिक रंग ओतले होते. समीक्षक आणि प्रेक्षकांनी नीना गुप्ता यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते. नीना गुप्ता यांचे कौतुक करताना सूरज बडजात्या म्हणाले, “ऊंचाईमधील नीना गुप्ता यांचा अभिनय हा त्यांच्या विलक्षण प्रतिभा आणि समर्पणाचा पुरावा आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा योग्यच आहे आणि ऊंचाईसाठी हा पुरस्कार मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे” *संपूर्ण टीमचा विजय*राजश्री प्रॉडक्शन, महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडियाने एकत्र येत ऊंचाईची निर्मिती केली, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका आणि परिणिती चोप्रा यांचा समावेश असलेल्या कलाकारांच्या टीमपासून प्रोडक्शन टीमपर्यंत सगळ्यांच्या टीमवर्क आणि समर्पण या यशामुळे सिद्ध झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.सूरज बडजात्या पुढे म्हणाले, “ऊंचाईच्या निर्मितीदरम्यान मला सर्व कलाकारांचा पूर्ण आधार होता. माझ्यावर आणि चित्रपटावर त्यांनी विश्वास ठेवला होता आणि त्यामुळेच अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत चित्रिकरण करण्यास ते तयार झाले. त्यांच्यासोबतचा हा प्रवास अविस्मरणीय झाला.”

*राजश्रीचा वारसा पुन्हा एका नव्या कल्पनेसह प्रेक्षकांसमोर*ऊंचाईसोबत, सूरज बडजात्या यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शिकीय कारकिर्दीच्या मूलभूत मूल्यांवर कायम राहात चित्रपट निर्माता म्हणून एका वेगळ्या कल्पनेला विकसित करण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली. नीना गुप्ता यांच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार जिंकणे हे त्यातूनच स्पष्ट होते. मैत्रीचा संदेश अधिक बळकट करणारा ऊंचाई चित्रपट प्रेक्षकांना सतत प्रेरणा देत राहील असा विश्वास सूरज बडजात्या यांना असून ते यात यशस्वी झालेच आहेत.सूरज बडजात्या म्हणतात, “माझं काम अजून काम झालेलं नाही,” हसत हसत पुढे त्यांनी सांगितले, “मला आणखी कितीतरी कथा सांगायच्या आहेत आणि अजून बरीच उंची गाठायची आहे.” ते त्यांच्या या कार्यात यशस्वी होऊन आणखी उंची नक्कीच गाठतील.


The Honourable President Of India, Smt. Droupadi Murmu Presented The Highest Award For Cinema In India, Today In New Delhi. Many Congratulations To Soorajji For This Milestone Win! BIG Celebration At @rajshrifilms!

Veteran Director Sooraj Barjatya Wins The Best Director Award For His Film Uunchai At The 70th National Film Awards.


“अनोख्या सर्जनशीलतेमुळेच ‘ऊंचाई’ने मला नवीन उंचीवर नेले”-सूरज बडजात्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सूरज बडजात्या यांनी व्यक्त केल्या भावना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *